सखी मला म्हणते, ‘तुझी आई लांब राहते ना, पुण्याला. मग मी तुझी आई आहे आणि तू माझी पिल्ली आहेस!’
सखीला काही लागल्यावर, ती रडल्यावर मी तिला जसं जवळ घेते, जशी मिठी मारते किंवा रात्री तिला कुशीत घेते, तसंच ती घरात मला किंवा तिच्या बाबांना करते. रात्री कधीतरी बाबांनी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं तर त्यांना थोपटवून ती स्वतः अंगाई गाते. एखाद्या दिवशी माझं डोकं दुखतंय असं तिला समजलं तर ती चेहऱ्यावरून हात फिरवते, मला जवळ घेते. ‘कुशीत ये आणि झोप’ असं सांगते.......